Wednesday, April 16, 2008

शनी

शनी हा सूर्यामालेतील सहावा ग्रह। गुरु ग्रहानंतर आकाराने सर्वात मोठा ग्रह पण हा त्याच्या आकारापेक्षा त्याच्या भोवताली असलेल्या देखण्या कड्यांमुळे अधिक प्रसिध्द आहे.

शनी ग्रह देखील गुरु ग्रहाप्रमाणे वायुरुपी ग्रह आहे। शनीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: १० तास लागतात व सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: २९ वर्ष लागतात. शनी ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत: १,४२६,७२५,४०० कि. मी. एवढे आहे.
शनी ग्रह आकाराने प्रचंड असलातरी याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे, म्हणजे जर शनी पाण्यात पडला तरी तो त्या पाण्यावर सहज तरंगेल.

शनी ग्रहाभोवती असणाऱ्या असंख्य लहान मोठ्या खडकांनी मिळून कडी निर्माण झाली आहेत। वस्तुत: या कड्यांची संख्या असंख्य आहेत. या कड्यांची प्रामुख्यांनी सात वेगवेगळ्या कड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या कड्यांमध्ये एक मोठी पोकळी दिसते या पोकळीला "कॅसिनी डिव्हिजन" असे म्हणतात. या पोकळीतील दोन कड्यांमधील अंतर ४,००० कि. मी. पोकळी आहे.

शनी ग्रह त्याच्या अक्षाभोवती साधारणत: २८ अंशांनी कललेला असलेल्यामुळे पृथ्वीवरुन आपणास शनीची कडी व्यवस्थित दिसतात, काही वेळा पृथ्वी शनीच्या विषुववृत्ताच्या पातळीत येते, त्यावेळी शनीच्या कडा पृथ्वीवरून दिसेनाशा होतात व फक्त एक बारीक रेषा दिसते.
शनीला एकूण ३० चंद्र आहेत.