Thursday, August 14, 2008

दिनांक १ ऑगस्ट २००८ चे खग्रास सुर्यग्रहण

हे सुर्यग्रहण संध्याकाळी ४.२७ मिनिटांनी सुरु झाले आणि संध्याकाळी ६.०२ वाजेपर्यंत होते.
हे विलोभनिय सुर्यग्रहणाचे छायाचित्र श्री. अमोल भायंदरकर यांनी जुईनगर, नवी मुंबई येथुन घेतले.

तसेच आत्ता दिनांक १६ ऑगस्ट २००८ चे चंद्रग्रहण रात्रॊ ११.०० वाजता पहायला विसरु नका.

Friday, July 4, 2008

धूमकेतू

धूमकेतू ओळखणे तर फारच सर्वात सोपी गोष्ट आहे. धूमकेतूने साधारणपणे सूर्यमालेत प्रवेश केला की आपल्याला धूमकेतूची शेपटी दिसते. या शेपटीमध्ये बर्फाच्छादित धुळीकण असतात.
धूमकेतू जसजसा सूर्याच्या जवळ यायला लागतो, त्यावेळी हे बर्फाच्छादित धुळीकण वितळून धूमकेतू पासून वेगळे होतात आणि या धुळीकणांची एक शेपटी तयार होते. धूमकेतू जसजसा सूर्यापासून दूर जात जातो तशी त्याची शेपटीसुद्धा दिसेनाशी होते. हे धूमकेतू आपणास जेव्हा मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करतात तेव्हापासून ते दिसावयास लागतात.
वर दिलेल्या छायाचित्रातील ग्रहांवर क्लिक केल्यावर त्या ग्रहांची माहिती मिळेल.

Tuesday, June 24, 2008

नेपच्यून

नेपच्यून हा सूर्यमालेतील आठवा ग्रह. हा ग्रहसुध्दा दुर्बिणीशिवाय दिसत नाही. नेपच्यूनचा शोध ४ ऑगस्ट १९४६ रोजी लागला. नेपच्यून हा युरेनस ग्रहाच्याही पूढे एक अब्ज मैल अंतरावर आहे. नेपच्यूनचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत: ४,४९८,२५२,९०० कि. मी. एवढे आहे व त्याचा व्यास साधारणत: ४९,५२८ कि. मी. एवढे आहे.
नेपच्यूनला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: १९ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: १६५ वर्षे लागतात.
अंतराळयानाने पाठवलेल्या माहितीप्रमाणे नेपच्यून ग्रहाभोवती देखील कडे आढळून आले आहे. परंतु इतर ग्रहांच्या कड्यांप्रमाणे हे कडे गोलाकार नसून घोड्याच्या नालेसारखे वाटते. ही कडी दुर्बिणीतून दिसत नाहीत.
नेपच्यून ग्रहावर मिथेन या विषारी वायूचे बनलेले आहे.
नेपच्यून ग्रहाला एकूण ११ चंद्र आहेत.



Monday, June 16, 2008

युरेनस

युरेनस हा सूर्यमालेतील सातवा ग्रह. शनी ग्रहानंतरचे इतर ग्रह आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत ते पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता भासते. ह्या ग्रहा शोध विल्यम हर्षल यांनी १३ मार्च १७८१ रोजी लावला. युरेनस ग्रहाला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास १६ तास लागतात. व सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ८४ वर्ष लागतात.
युरेनस सूर्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रदक्षिणा करत असला तरी तो स्वत:भोवती मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रदक्षिणा पूर्ण करतो. युरेनसचा व्यास साधारणत: ५१,११९ कि. मी. एवढा आहे.
युरेनस त्याच्या आसाभोवती ९८ अंशांनी कललेला असलेल्यामुळे तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. यामुळे कधी कधी युरेनसच्या ध्रुवाचे तर कधी कधी विषुववृत्तीय भाग दिसतो.
युरेनसला देखील शनी ग्रहाप्रमाणे कडे आढळले आहे पण ही कडा दुर्बिणीतून दिसत नाहीत. ही कडा युरेनसच्या केंद्राभागापासून ५०,००० कि. मी. अंतरावर आहे.
युरेनस ग्रहाला एकूण १५ चंद्र आहेत.
युरेनस ग्रह आपल्या कक्षेवरुन दर सेकंदाला एक मैल सरकतो. तसेच युरेनसभोवती देखील चुंबकीय क्षेत्र असल्याचे आढळून आले आहे.

Wednesday, April 16, 2008

शनी

शनी हा सूर्यामालेतील सहावा ग्रह। गुरु ग्रहानंतर आकाराने सर्वात मोठा ग्रह पण हा त्याच्या आकारापेक्षा त्याच्या भोवताली असलेल्या देखण्या कड्यांमुळे अधिक प्रसिध्द आहे.

शनी ग्रह देखील गुरु ग्रहाप्रमाणे वायुरुपी ग्रह आहे। शनीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: १० तास लागतात व सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: २९ वर्ष लागतात. शनी ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत: १,४२६,७२५,४०० कि. मी. एवढे आहे.
शनी ग्रह आकाराने प्रचंड असलातरी याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे, म्हणजे जर शनी पाण्यात पडला तरी तो त्या पाण्यावर सहज तरंगेल.

शनी ग्रहाभोवती असणाऱ्या असंख्य लहान मोठ्या खडकांनी मिळून कडी निर्माण झाली आहेत। वस्तुत: या कड्यांची संख्या असंख्य आहेत. या कड्यांची प्रामुख्यांनी सात वेगवेगळ्या कड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या कड्यांमध्ये एक मोठी पोकळी दिसते या पोकळीला "कॅसिनी डिव्हिजन" असे म्हणतात. या पोकळीतील दोन कड्यांमधील अंतर ४,००० कि. मी. पोकळी आहे.

शनी ग्रह त्याच्या अक्षाभोवती साधारणत: २८ अंशांनी कललेला असलेल्यामुळे पृथ्वीवरुन आपणास शनीची कडी व्यवस्थित दिसतात, काही वेळा पृथ्वी शनीच्या विषुववृत्ताच्या पातळीत येते, त्यावेळी शनीच्या कडा पृथ्वीवरून दिसेनाशा होतात व फक्त एक बारीक रेषा दिसते.
शनीला एकूण ३० चंद्र आहेत.

Tuesday, March 25, 2008

गुरु

गुरु ग्रह हा आपल्या सूर्यमलेतील पाचवा ग्रह, गुरु ग्रह नावाप्रमाणेच सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांचा गुरुच आहे. कारण गुरु ग्रह हा सर्व ग्रहांपेक्षा आकाराने सर्वात मोठा आहे. याचा व्यास साधारणत: १,४२,९८५ कि. मी. एवढे आहे, म्हणजेच आपल्या पृथ्वीसारख्या ११ पृथ्वी गुरु ग्रहाच्या व्यासावर सहजच एका ओळीत बसतील. गुरुचे सूर्यापासूनचे अंतर ७७८,४१२,०१० कि. मी. एवढे आहे.
सूर्यमालेतील बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे ग्रह घनरुप पदार्थांनी बनलेले आहेत. तर गुरु ग्रहाचा अंतर्भाग द्रवरुप लोखंडाचा आहे व त्याचा पृष्ठभागावर वायूचे दाट ढग आहेत. गुरुच्या पृष्ठभाग वायुरुपी असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात वादळ होत असतात. ह्या वादळांमुळेच गुरुवर आडवे पट्टे व एक मोठा भोवरा निर्माण झाला आहे. त्या भोवऱ्याला रक्तरंजीत लाल ठिपका असे देखील म्हणतात. या मोठ्या भोवऱ्याचा आकार आपल्या पृथ्वीच्या तिपट्ट आहे.
गुरु ग्रहाचे आकाराप्रमाणे त्याचे गुरुत्वाकर्षण देखील प्रचंड आहे. तसेच त्याचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग देखील प्रचंड आहे. गुरुला स्वत:भोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ९ तास ५० मिनिटे लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्यास १२ वर्ष लागतात. गुरुसुध्दा पृथ्वीप्रमाणे एक मोठा चुंबकिय ग्रह आहे.
गुरुला दुर्बिणीने पाहिल्यास त्याचे चार चंद्र दिसतात. हे चंद्र प्रथम गॅलिलिओने पाहिले म्हणून या चंद्राना गॅलिलिओचे चंद्र देखील म्हणतात. या चार चंद्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - इयो, युरोपा, गॅनिमेड व कॅलिस्टो. असे गुरुचे लहान मोठे मिळून एकूण ६१ चंद्र आहेत.

लघुग्रह

लघुग्रह म्हणजे ठराविक आकार नसलेले लहान-मोठे दगड जे मंगळ व गुरु या ग्रहांच्यामध्ये सूर्याभोवती गोलाकार अशी प्रदक्षिणा पूर्ण करतात. या लघुग्रहांच्या पट्ट्यात असंख्य असे लघुग्रह आहेत. यांचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत: २.७ खगोलिय एकक आहे.

Tuesday, March 18, 2008

मंगळ

मंगळ हा सूर्यमालेतील पृथ्वीनंतरचा चौथा ग्रह. हा आकाराने पृथ्वीच्या व्यासाच्या निम्याहून थोडा जास्तच म्हणजे ६,७९५ कि. मी. एवढे आहे, व सूर्यापासुन याचे अंतर साधारणत: २२२७,९३६,६४० कि. मी. एवढे आहे. मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या दृष्टीने पहिला बहिर्ग्रह असल्यामुळे आपल्या आकाशात हा संपूर्ण रात्रभर देखील दिसतो.
मंगळ ग्रहाला स्वत:भोवती फिरण्यास २४ तास ३६ मिनिटे लागतात, तसेच सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास मंगळास ६८७ दिवस लागतात मंगळदेखील पृथ्वीप्रमाणे त्याच्या आसाभोवती २५.१९ अंशांनी कललेला असल्यामुळे याच्यावरदेखील पृथ्वीप्रमाणे उन्हाळा व हिवाळा असे दोन ऋतु आहेत.
हा ग्रह लालसर तांबडा रंगाचा दिसतो. मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले आहेत. यापैकी कित्येक ज्वालामुखी अजूनही जीवंत आहेत. मंगळावर निरीक्षणाद्वारे कालव्याच्या खुणा आढळल्या आहेत, यावरून पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे असा अंदाज आहे. तसेच या ग्रहावर एक प्रचंड मोठी एक दरी आहे ती आपल्याला पृथ्वीवरुन शक्तीशाली दुर्बिणीतून सुध्दा दिसते. या दरीला "मरिना दरी" असे म्हणतात.
मंगळावर सूर्याच्या बाजूवरील भागाचे तापमान साधारणत: २० अंश सेल्सीयस तर विरुध्द भागाचे तापमान १८० अंश सेल्सीयस असते.
मंगळ ग्रहाला दोन चंद्र आहेत. त्यातील जवळ असलेल्या चंद्राचे नाव फोबोस व दुरच्या चंद्राचे नाव डिमॉस आहे. यापैकी फोबोस मंगळापासून ५,८८० मैल आणि डिमॉस १४,६०० मैल अंतरावरुन मंगळाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात.

Monday, March 10, 2008

पृथ्वी

आपली पृथ्वी शुक्र ग्रहानंतर सूर्यमालेतील तिसरा ग्रह. आपली पृथ्वी एक संपूर्ण विश्वामधील जीवसृष्टी असलेली एकमेव ग्रह आहे. पृथ्वीला निळा ग्रह सुध्दा म्हणतात.
पृथ्वीचा व्यास १२,७५६ कि. मी. एवढा आहे, व सूर्यापासून पॄथ्वीचे अंतर साधारणपणे १४९,५९७,८९० कि. मी. एवढे आहे.
पृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या आसाभोवती २३.५ अंशांनी कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वत:भोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतूचक्र सुरु असते.
आपल्या पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे लागतात. पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता तर पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली नसती, तसेच पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण व सूर्यापासूनचे ठराविक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यामुळेच आपल्या पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण झाली असावी.
पृथ्वीला एक उपग्रह आहे तो म्हणजे आपला चंद्र.

Wednesday, March 5, 2008

शुक्र

शुक्र आपल्या सूर्यमालेतील बुध ग्रहनंतरचा दुसरा ग्रह. हा आकाराणे आपल्या पृथ्वीएवढाच आहे. याचा व्यास १२,१०४ कि. मी. एवढा आहे. शुक्र देखील आंतरग्रह आहे. यामुळेच शुक्रदेखील आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो.
या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्याप्रमात परावर्तित होतो. म्हणुन शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो.
शुक्राला स्वत:भोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पुर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. तसे बघितले तर शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे.
शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०८,२०८,९३० कि. मी. एवढे आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह एकसारख्याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पुर्वेकडे या दिशेने फिरतात. फक्त शुक्र हा एकच ग्रह पुर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो.
शुक्र हा देखील आंतरग्रह असल्यामुळे याचेसुध्दा सूर्यावरील अधिक्रमण आपणास पहावयास मिळते.
शुक्राला देखील एकही चंद्र नाही.