Friday, December 14, 2007

बुध

बुध आपल्या सूर्यामालेतील सूर्याला सर्वात जवळ असलेला ग्रह. हा आपल्या पृथ्वीच्या चंद्रपेक्षा थोडा आकाराने मोठा आहे. याचा व्यास ४,८७८ कि. मी. एवढे आहे. तसेच सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असल्यामुळे बुध ग्रहास आंतग्रह असेही म्हणतात, म्हणूनच बुध ग्रह सकाळी आणि संध्याकाळीच आपल्याला आकाशात दिसतो. पण बुध ग्रह नेहमीच दिसतो असे नाही. बुध ग्रह वर्षभरात फक्त काही काळच दिसतो.
बुध ग्रह साधारणत: ५९ दिवसात स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ८८ दिवस लागतात. सूर्यापासून बुध ग्रह हा फक्त ५७,९०९,१७५ कि. मी. एवढ्या अंतरावर आहे. या ग्रहाचे सूर्याच्या बाजूकडील भागाचे तापमान ४२० अंश सेल्सीयस इतके प्रचंड असते, तर सूर्याच्या विरुध्द बाजूकडील तापमान अत्यंत थंड म्हणजेच -२०० अंश सेल्सीयस असते. या दोन्ही तापमानात कोणताही सजीव जीवंत राहू शकणार नाही. तसेच या ग्रहावर वातावरण नसल्यामुळे सातत्याने होणाऱ्या उल्कावर्षावाने बुध ग्रह फारच खडबडीत दिसतो. या ग्रहावर गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे यावर वातावरणाचा अभाव जाणवतो.
बुध ग्रहाचा सूर्याभोवती भ्रमणाचा मार्ग हा दीर्घ वर्तुळाकृती आहे. तसेच सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे बुधाच्या भ्रमण मार्गावर मोठा परीणाम होतो.
बुध ग्रह हा आंतरग्रह असल्यामुळे आपल्याला त्याच्या कलासुध्दा पहावयास मिळतात, तसेच काहीवेळेस आपणास पृथ्वीवरुन बुधाचे सूर्यावरील अधिक्रमण पहावयास मिळते.
बुध ग्रहास एकही उपग्रह (चंद्र) नाही.

Tuesday, December 4, 2007

सूर्य

मगील लेखात आपण आपल्या सूर्यमालेचा जन्म कसा झाला ते पाहिले.
आत्ता आपण आपल्या ग्रहमालेविषयी माहिती पाहूया.

प्रथम सूर्याची माहिती पाहू.


सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा प्रमुख तारा. या सूर्याभोवतीच आपली ग्रहमाला फिरते.

सूर्य
हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला तारा. या सूर्यामुळेच आपल्या पृथ्वीवरील सजीवांस जगण्यास अवश्यक उर्जा मिळते.

आपल्या सूर्यमालेतील सर्वात अत्यवश्यक घटक असलेला सुर्य सर्वच बाबतीत प्रचंड मोठा आहे. सूर्याचा आकार आपल्या पृथ्वीच्या मानाने खुप मोठा आहे, साधारणपणे सूर्याच्या व्यासावर १०९ पृथ्वी राहू शकतील. थोडक्यात सूर्याचा व्यास साधारणपणे १३,९२,००० कि. मी. एवढा आहे.
सूर्यावर प्रामुख्याने हायड्रोजन व हिलीयम वायू आढळतात। सूर्यावर दर सेकंदाला हजारो टन हायड्रोजन वायूचे जळून हिलीयम वायूमध्ये रुपांतर होते.

सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान ६००० अंश सेल्सीअस व गाभ्यातील तापमान सुमारे १,६०,००० अंश सेल्सीअस इतके आहे.

Tuesday, August 21, 2007

आपल्या सुर्यमालेचा जन्म

पाच अब्ज वर्षापूर्वी आपल्या आकाशगंगेच्या असंख्य तारकांमध्ये धुळीकण आणि वायुचा एक विशाल कृष्णवर्णी मेघ अवकाशात तरंगत होता. हा मेघ सर्व दिशांना निराकार आणि निर्विकार फिरत होता. एक दिवस अचानक त्या मेघाच्या स्वरुपात कायापालट होण्यास सुरुवात झाली.
अचानक या विशाल मेघाच्या आकुंचनाला सुरुवात झाली. मेघातील अती सुक्ष्म कण परस्परांच्या जवळ येऊ लागले. या कणांची गती क्षणाक्षणाला वाढू लागली आणि हा विशाल मेघ आपल्याच गुरुत्वाकर्षाणामुळे कोलमडू लागला. प्रारंभी हि प्रक्रिया हळुवार होत होती, कालांतराने या प्रक्रियेने चांगलाच वेग धरला. हे चक्र असेच लक्षावधी वर्षे चालू होते. शेवटी मेघाच्या केंद्रभागी अतीघन असा गाभा निर्माण झाला. त्या गाभ्याचे गुरुत्वकर्षण अती उच्च झाले. आकुंचन होताना ते मेघ जवळील उष्णता बाहेर प्रक्षेपित करीत होते.

मेघाच्या मुख्य स्वरुपाला आता हळूहळू आकार येऊ लागला. या मेघाला प्रथम दिर्घ वर्तुळाकार व नंतर बैलगाडीच्या चाकाप्रमाणे आकार प्राप्त झाला. चाकाच्या केंद्रस्थानी गुरुत्वाकर्षण, घनता व तापमान यांचे प्रमाण सर्वात जास्त होते. मेघांच्या भ्रमण कक्षे बाहेर असलेली धूळ आणि वायु अंतर्भागात जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्या चाकाच्या निरनिरळ्या भागात त्यांचे छोटे मोठे पुंजके बनू लागले. हे पुंजके स्वत:भोवती भ्रमण करता करता मुळ मेघाच्या केंद्रभागीसुद्धा भ्रमण करु लागले. हाच आपल्या ग्रहमालेचा सुरवातीचा प्रवास होता.

मेघाच्या अंतरभागात प्रचंड उष्णता निर्माण झाली व धूळीचे वाफेत रुपांतर झाले. मेघांचे तापमान वाढल्यामुळे केंद्रतील वायूचा बाह्यवर्ती दाब वाढला आणि शेवटी हा दाब एवढा वाढला की गुरुत्वाकर्षणामुळे चालू असलेली मेघांची आकुंचन क्रिया खुप मंदावली. आकुंचनाची क्रिया चालू झाल्यापासून काही सहस्त्र वर्षांनी या मेघाचे आकुंचन थांबले आणि या मेघांच्या गर्भातच आपल्या सुर्याचा जन्म झाला.

सुरुवातीला आपल्या सुर्याचे स्वरुप फार विचित्र होते. प्लुटोच्या कक्षेपर्यंत धूळ व वायु यांच्या शिवाय दुसरे काही दिसत नव्हते. रेशमी किड्याच्या कोशाप्रमाणे मेघाच्या गर्भात आपला सुर्य अतिरिक्त उष्णता विसर्जित करीत होता.

उष्णता उत्सर्जनामुळे सुर्याच्या तापमानात बदल झाला नाही, पण दाब मात्र कमी झाला. नंतरच्या काळात सुर्याचे आकुंचन होत गेले आणि काही लक्ष वर्षांनी सुर्याच्या आंतर्भागातील तापमान दीड कोटी अंश सेल्शिअसपर्यंत होत गेले. ही प्रक्रिया सुरू असताना अचानक अंतर्गत उष्णतेने विशिष्ट कमाल मर्यादा ओलांडली व अंतर्भागात आण्विक उर्जा प्रकट झाली. असे होताना हायड्रोजनच्या अणु मिलनाने हिलिअमची निर्मिती होण्यास सुरूवात झाली. हाच तो महत्वाचा क्षण होता आपल्या सुर्याच्या जन्माचा!

उष्णता वाढीचे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे आकुंचनाचे चक्र समाप्त झाले. आजपर्यंत ही प्रक्रिया सातत्याने चालू आहे.

कोषातील बहुतांश वस्तु सुर्यानेच आत्मसात केली. शिल्लक राहिलेले कणांचे अगदी लहान गोलात रुपांतर झाले. हे गोल आपआपसात टकरी घेत व तुकडे होऊन पुन्हा एकत्र येत आणि पुन्हा त्यांचे मोठ्या गोलात रुपांतर होई, ही प्रक्रिया होत असताना कही लक्ष वर्षांनी या गोळ्यांनी लहान मोठा आकार घेतला. हे गोल म्हणजेच आपले ग्रह. सुर्याच्या उष्णतेमुळे या ग्रहांवर बराच प्रभाव पडला. बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ यांचे वस्तुमान खडकंनी बनले गेले, व गुरुपासूनचे पुढील ग्रह वायुरूपी बनले. हलकी मुलद्रव्ये सुर्यापासून दूर फेकली गेली.

गुरु ग्रहाने सर्वात जास्त मुलद्रव्ये आपल्याकडे खेचुन घेतली, त्यामुळे गुरु ग्रह बराच मोठा व गुबगुबीत झाला. गुरु ग्रहाने स्वत:च्या व मंगळ ग्रहाच्या दरम्यान दुसरा ग्रह निर्माण होण्यास प्रतिबंद केला व त्या जागी लहान मोठे तुकडे तसेच अवकाशात भटकत राहिले. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांचे ग्रहात रूपांतर होऊ शकले नाही. त्या तुकड्यांस आपण लघुग्रहांचा पट्टा असे संबोधीतो.

आपल्या सुर्यामालेत काही छोट्या आकाराचे गोलही तयार झाले. ग्रहांच्या खेचाखेचीमध्ये अचानक गोल पृथ्वीच्या जाळ्यात सापडला; ज्याला आपण चंद्र असे म्हणतो. असेच इतर ग्रहांच्या बाबतीतही हेच झाले व त्यांना सुध्दा आपल्यासारखा चंद्र (उपग्रह) मिळाले. हे उपग्रह त्यांच्या ग्रहांच्या कक्षेत फिरु लागले. सर्वात जास्त उपग्रह गुरु ग्रहाला आहेत.

तसेच काहीप्रमाणे शनी ग्रहाच्या बाबतीतही झाले, पण शनीभोवतीचे काही कण एकत्र न येता तसेच शनी ग्रहाभोवती त्याच्या कक्षेत फिरत राहिले, याच कणांचे पुढे अद्वितीय अश्या कड्यांमध्ये रुपांतर झाले. अश्या प्रकारची कडी इतर ग्रहांना सुध्दा आहेत, पण ते पाहण्यास मोठी दुर्बिणीची आवश्यकता पडते. शनी ग्रहाची कडी पाहण्यासाठी साधारण दुर्बिणसुध्दा चालते.

सुर्याभोवती पसरलेल्या मेघात अनेक मुलद्रव्य होती. बुध या ग्रहावर लोहाचे प्रमाण जास्त आढळते. शुक्र, पृथ्वी व मंगळ यावर खडक, माती आणि सिलिकेट आदी मुलद्रव्य आढळतात. लघुग्रहांचा पट्टा या मुलद्रव्यांची अंतिम मर्यादा आहे. त्या पलीकडे तपमान खुप कमी होत गेले. पुढील सर्व ग्रहांवर बर्फाचे थर साचले. त्यात नायट्रोजन द्रवरूपात व मिथेन घनरुपात आढळते. नेपच्युन व युरेनसची वाढ होत असताना त्यांनी लहान मोठे आकाराचे बर्फाचे तुकडे दुर इतरस्त्र भिरकावून दिले त्यामुळे धुमकेतूच्या मेघांची निर्मीती झाली; त्यास आपण "ऊर्ट मेघ" असे म्हणतो. ह्या धुमकेतूंना सुर्यमालेत भिरकवण्याचे काम सुध्दा या दोन ग्रहांनी केले. गुरु ग्रहाने बहुतेक हे धुमकेतू स्वत:कडे खेचून घेतले व राहिलेले धुमकेतू इतर ग्रहांवर आदळले. ४.५ अब्ज वर्षांपर्यंत हा प्रकार असाच चालु होता. अशाच धुमकेतूमुळे बर्फाच्या अवस्थेत असलेले पाणी पृथ्वीवर आले, व जीवसृष्टीला पोषक असे वातावरण निर्माण झाले. पुर्वी सागरात असलेले पाणी आजच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात होते.

अशी ही आपल्या सुर्यमालेच्या जन्माची थोडक्यात कहाणी. हे असेच गेले ५ अब्ज वर्ष सतत चालू आहे व पुढेही असेच चालू रहिल.

Tuesday, July 17, 2007

आकाशगंगेतील घटक भाग - ३



बंदिस्त तारका गुच्छ (ग्लोब्युलर क्लस्टर्स)

‘बंदिस्त तारका गुच्छ’ म्हणजे अगणीत ताऱ्यांचा एकत्र समुह. ह्या प्रकारच्या ताऱ्यांचा समुह पुर्णपणे गोलाकार असतात, आणि सर्वसाधारणपणे एका मर्यादित क्षेत्रात एकवटल्यासारखे दिसतात. आकाशगंगेतील धनु राशीच्या क्षेत्रात बंदिस्त तारका गुच्छ एकत्र आहेत असे दिसतात.

बंदिस्त तारका गुच्छामध्ये १० हजार ते १० लक्ष पर्यंत अनेक तारे असू शकतात.

बंदिस्त तारका गुच्छ हे आपल्या आकाशगंगेच्या वरच्या किंवा खालच्या पातळीच्या अवकाशातच आढळतात. काही बंदिस्त तारका गुच्छ आकाशगंगेच्या जन्मानंतर काही अब्ज वर्षातच निर्माण झाले आहेत. त्यामुळे आपल्या आकाशगंगेतील वृध्द तारे या प्रकारच्या तारका गुच्छामध्येच आढळतात. बंदिस्त तारका गुच्छात रक्तरंगी राक्षसी तारे, रक्तवर्णी आणि शुभ्रवर्णी खुजे तारे, अशा वृध्द ताऱ्यांचा समावेश असतो.

बंदिस्त तारका गुच्छ आकाशगंगेभोवती तिरकस भ्रमण करतात. त्यातील काही स्वत:भोवतीही भ्रमण करतात. बंदिस्त तारका गुच्छातील तारे एकमेकांच्या जवळ असल्यामुळे ते एकमेकांच्या गतीवरही परिणाम करतात. कधी कधी बंदिस्त तारका गुच्छ आपले तारेसुध्दा गमवतात.

काही बंदिस्त तारका गुच्छ क्ष किरण उत्सर्जित करतात, तर काही बंदिस्त तारका गुच्छांमधून क्ष किरणांचे उद्रेक होतात. अशावेळी उत्सर्जित होणारी ऊर्जा, त्याच वेळेत सुर्याने उत्सर्जित केलेल्या ऊर्जेपेक्षा कित्येक पटीने मोठी असते.

वरील छायाचित्र हे एम ८० या बंदिस्त तारका गुच्छाचे आहे.

अशाप्रकारचे काही घटक आपल्या आकाशगंगेत आहेत ते आपण पाहिले.

Monday, July 9, 2007

आकाशगंगेतील घटक भाग - २

खुले तारका गुच्छ

आकाशगंगेतील तारे सर्व दिशांना समप्रमाणात विखुरलेले नाहीत, तर काही ठिकाणी अनेक युवा ताऱ्यांनी आपले समुह बनवलेले आहेत या अशाच समुहांना आपण "खुले तारका गुच्छ (ऒपण क्लस्टर्स)" असे संबोधितात. असे अनेक खुले तारका गुच्छ आपल्या आकाशगंगेत विखुरलेले आहेत. त्यातील काही तारका गुच्छ आपल्याला साध्या डोळ्यांनीसुद्धा स्पष्ट दिसतात. त्यातील कृत्तिका आणि रोहिणी हे तारका गुच्छ उत्तम उदाहरण आहेत.

आत्तापर्यंत साधारणपणे ७०० खुले तारका गुच्छांचा शोध लागलेले आहेत. त्यापैकी कित्येक खुले तारका गुच्छ सुर्यापासून ६५२० प्रकाशवर्ष अंतरावर आहेत. आपल्या संपूर्ण आकाशगंगेत असंख्य खुले तारका गुच्छ असावेत असा अंदाज आहे. यातील अजुन काही ठराविक तारकागुच्छ कर्क राशीत ‘प्रेसेपे’ आणि ययाती तारकासमुहातील ‘एच’ हे आहेत. यांच्यासारख्या आकारमानासारखे मोठे तारका गुच्छही भरपूर आहेत.

खुले तारका गुच्छांचे वय कित्येक दशलक्षापासून काही अब्ज वर्षांपर्यंत असू शकते. मगाशी आपण वाचलेल्या तारका समुहांपैकी कृत्तिकेचे वय ६ कोटी वर्षे, तर एम या तारकागुच्छाचे वय ४ अब्ज वर्षे असावे.

खुले तारका गुच्छातील सर्व तारे अवकाशात एका विशिष्ट दिशेने प्रवास करतात. त्यांची गती प्रती सेकंदाला कित्येक किलोमीटर असते. ज्या तारका गुच्छातील तारे अवकाशात तुलनेने जास्त अंतर सरकतात, त्यांना गतिमान तारकागुच्छ असे म्हणतात.

चित्रात दाखविलेला खुले तारका गुच्छ हा कृत्तिकेचा आहे.

Wednesday, June 20, 2007

आकाशगंगेतील घटक

मागील लेखात आपण आकाशगंगेची माहिती वाचली. तर या आपल्या आकाशगंगेला "मंदाकिनी" असे संबोधतात.

आत्ता आपण आपल्या आकाशगंगेतील घटक बघुया.

आंतरतारकीय वायु

आकशगंगेचे दहा टक्के वस्तुमान वायुरुपी आहे. आकाशगंगेचा आकार लक्षात घेता तिच्यामधील वायु अती विरळ व पारदर्शिच असावेत.
आकाशगंगेतील सर्पिलाकार बाहूंच्या सर्व भागांत आंतरतारकीय वायूवे अस्तित्व आहे. त्यात ७५% हायड्रोजन आणि हीलीयम या दोन वायूंचे एकुण प्रमाण ९९% आहे. हायड्रोजन वायू उदासीन अथवा विद्युतभारीत या दोन प्रकारात आढळतो. आंतरतारकीय अवकाशातील क्षेत्र हायड्रोजनच्या प्रकारावरून ओळखतात.

धूलीकण

आकाशगंगेच्या काही भागात तारे आढळत सुद्धा नाहीत. वस्तुत: तेथे प्रकाश प्रतिबंधक मेघ आहेत. त्यात काही पुर्णपणे कृष्णवर्णी असतात कही मेघांतून प्रकाश झिरपू शकतात. ह्या प्रकाशप्रतिबंधक द्रव्याला "धूळ" असे संबोधतात. धूळीकण आकाराणे अतिशय लहान असतात, ते मायक्रोमीटर या परीमाणातच मोजावे लागतात.
ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आदिंचे रेणू घन भारीत होऊन त्यांचे धुळीकणांत रूपांतर होते. धुळीकणांचे वस्तुमान अगदीच नगन्य असावे. धुळीकणांचे प्रमाण सर्वत्र सारखे नसते. काही ठिकाणी ते घन इतके असतात की इतर ताऱ्यांकडून येणारा सर्व प्रकाश धुळीकणांमध्ये शोषला जातो. काही वेळा तेजस्वी तेजोमेघांच्या पार्श्वभुमीवर कृष्णवर्णी तेजोमेघ उठून दिसतात.

ग्लोब्युल्स

आपली आकाशगंगा ही एक प्रकारची अजब खजिनाच आहे. ग्लोब्यूल्स हा एक विलक्षण प्रकार, आकाशगंगेतील वैशिष्टपूर्ण आकाराचे कृष्णवर्णी मेघ म्हणजेच "ग्लोब्युल्स". ग्लोब्युल्स सर्वसाधारणपणे एक साखेच गुणधर्म दाखवतात. प्रत्येक ग्लोब्युल्सचा रंग कृष्णवर्णी असतो. ते स्वतंत्र आणि जवळ जवळ गोलाकार असतात पण त्यांचे आकार एक सारखे नाहीत. ग्लोब्युल्सचा व्यास १.३ ते ४ प्रकाशवर्ष एवढे आढळून येतात. तसेच त्यांचे वस्तुमान जास्तीत जास्त म्हणजे सुर्याच्या २०० पट जास्त तर कमीत कमी सुर्याच्या २० पट कमी असते. प्रामुख्याने ग्लोब्युल्स हायड्रोजनच्या रेणूंनी बनलेले असतात.

पुढील भागात आपण आकाशगंगेचे अजुन काही प्रकार पाहू:

Tuesday, May 22, 2007

चंद्र शुक्र युती

दिनांक २० मे २००७ रोजी सायंकाळी शुक्र ग्रह चंद्राच्या जवळ दिसत आहे. हे मनोहरी दृश्य जुईनगर, नवी मुंबई येथून टिपलेले आहे.

हे छायाचित्र ऎपिटेक ८ मेगा पिक्सेलच्या कॆमेराने टिपले आहे.

Wednesday, May 16, 2007

आपली आकाशगंगा

आपली आकाशगंगा म्हणजे या अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. त्यात आपला सुर्य तारा या संघातील एक सामान्य सभासद आहे. या विश्वाच्या तुलनेत आपल्या आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी तारे आहेत. आपल्या आकाशगंगेचे विशाल स्वरुप, तिचा वैशिष्ट्यपुर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी मनाला थक्क करतात. आपल्या आकाशगंगेच्या ज्या भागात आपले वास्तव्य आहे तेथून तिच्या भव्यपणाची कल्पना करणे केवळ अशक्य आहे. तिच्या एक टोकापासून निघलेला प्रकाशकिरण दुसर्या टोकापर्यंत पोहोचायला कमीत कमी एक लाख वर्षाचा काळ लागतो.

अमावास्येच्या रात्री आकाशाचे वर्णन करणे अशक्य आहे. कारण या रात्री आकाशात तारकांची इतकी गर्दी झालेली दिसते की, नेहमीची नक्षत्रेसुद्धा ओळखणे कठीण होते. जरा निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा गूढ प्रवाह आपल्याला दिसतो. या गुढ प्रवाहालाच आपली आकाशगंगा आपण म्हणतो.

आपल्या आकाशगंगेची एक ग्रीक गोष्ट अशी आहे की, एके काळी ज्युपिटर देवाची पट्टराणी, जुनो, आपल्या मुलाला हर्क्युलसला स्तनपान करीत होती. हर्क्युलस अतिशय अवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपान करीत असताना हर्क्युलसचा अवखळपणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही त्याचा दुधाळ पट्टा आपल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्याला "दुग्ध मार्ग", "मिल्की वे" असे नाव ठेवले.

आपला सुर्य मध्यवर्ती तबकडीच्या केंद्रीय पातळीतला एक मध्यम प्रतीचा तारा आहे. आकाशगंगेच्या केंद्रापासून आपला सुर्य साधारण ३५००० प्रकाशवर्ष दूर आहे.

Tuesday, April 24, 2007

खग्रास चंद्र ग्रहण : मार्च ३, २००७

खग्रास चंद्र ग्रहण ३ मार्च रोजी पहाटे २ वाजून ४५ मि. सुरु होऊन सकाळी ६ वाजुन ४५ मि. नी सुटले. या ग्रहणातला इथे एक फोटो दिला आहे.
हा फोटो जुईनगर, नवी मुंबई येथुन काढला आहे.

फोटो काढण्यासाठी १२५ एम. एम. ची. न्युटन प्रकारातली टेलिस्कोप, आणी १८ एम. एम. ची. आयपिस लेन्स व ८ मेगा पिक्सेलचा अपिटेकचा डिजीटल केमेरा वापरला.

छायाचित्र श्री. अमोल र. भाईंदरकर आणी श्री. सुदेश रा. धोत्रे यांच्या संयोगाने

खंदाग्रस सुर्यग्रहन : मार्च १९, 2007
या दिवशी आपल्या येथे गुढी पाडवा हा सण होता. आपल्या येथे खंडग्रास सुर्यग्रहण पहाटे सुर्य उगवतनाच लागले होते. या सुर्य ग्रहणाचे फोटो नवी मुंबईतील जुईनगर येथून काढले आहेत. या फोटोतील देखावा एम. आय. डि. सी. भागातील डोंगर रांगांतून घेतला आहे. हे सुर्य ग्रहण साधारण ५० मि. चालले होते.

फोटो काढण्यासाठी १२५ एम. एम. ची. न्युटन प्रकारातली टेलिस्कोप, आणी १८ एम. एम. ची. आयपिस लेन्स व ८ मेगा पिक्सेलचा अपिटेकचा डिजीटल केमेरा वापरला.

छायाचित्र श्री. अमोल र. भाईंदरकर आणी श्री. सुदेश रा. धोत्रे यांच्या संयोगाने
चंद्र आणि मंगल पिधन युति : १४ अप्रिल २००७
या फोटोमध्ये एक बिंदू दिसतो तो मंगळ ग्रह आहे. तो दिनांक १४ एप्रिल २००७ रोजी पहाटे ५.४५ मिनिटांनी चंद्राच्या मागे गेला. आणि सकाळी सुर्य उगवल्यावर ६.१० मिनिटांनी मंगळ चंद्राच्या पाठून बाहेर आला.


पिधान युती म्हणजे आपल्या सुर्यमालेतील ग्रह आणी तारे चंद्राच्या काही काळासाठी मागे जातात व थोड्या वेळाने पुन्हा दिसु लागतात.
फोटो काढण्यासाठी १२५ एम. एम. ची. न्युटन प्रकारातली टेलिस्कोप, आणी १८ एम. एम. ची. आयपिस लेन्स व ८ मेगा पिक्सेलचा अपिटेकचा डिजीटल केमेरा वापरला.

छायाचित्र श्री. अमोल र. भाईंदरकर आणी श्री. सुदेश रा. धोत्रे यांच्या संयोगाने