Tuesday, March 25, 2008

गुरु

गुरु ग्रह हा आपल्या सूर्यमलेतील पाचवा ग्रह, गुरु ग्रह नावाप्रमाणेच सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांचा गुरुच आहे. कारण गुरु ग्रह हा सर्व ग्रहांपेक्षा आकाराने सर्वात मोठा आहे. याचा व्यास साधारणत: १,४२,९८५ कि. मी. एवढे आहे, म्हणजेच आपल्या पृथ्वीसारख्या ११ पृथ्वी गुरु ग्रहाच्या व्यासावर सहजच एका ओळीत बसतील. गुरुचे सूर्यापासूनचे अंतर ७७८,४१२,०१० कि. मी. एवढे आहे.
सूर्यमालेतील बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे ग्रह घनरुप पदार्थांनी बनलेले आहेत. तर गुरु ग्रहाचा अंतर्भाग द्रवरुप लोखंडाचा आहे व त्याचा पृष्ठभागावर वायूचे दाट ढग आहेत. गुरुच्या पृष्ठभाग वायुरुपी असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात वादळ होत असतात. ह्या वादळांमुळेच गुरुवर आडवे पट्टे व एक मोठा भोवरा निर्माण झाला आहे. त्या भोवऱ्याला रक्तरंजीत लाल ठिपका असे देखील म्हणतात. या मोठ्या भोवऱ्याचा आकार आपल्या पृथ्वीच्या तिपट्ट आहे.
गुरु ग्रहाचे आकाराप्रमाणे त्याचे गुरुत्वाकर्षण देखील प्रचंड आहे. तसेच त्याचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग देखील प्रचंड आहे. गुरुला स्वत:भोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ९ तास ५० मिनिटे लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्यास १२ वर्ष लागतात. गुरुसुध्दा पृथ्वीप्रमाणे एक मोठा चुंबकिय ग्रह आहे.
गुरुला दुर्बिणीने पाहिल्यास त्याचे चार चंद्र दिसतात. हे चंद्र प्रथम गॅलिलिओने पाहिले म्हणून या चंद्राना गॅलिलिओचे चंद्र देखील म्हणतात. या चार चंद्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - इयो, युरोपा, गॅनिमेड व कॅलिस्टो. असे गुरुचे लहान मोठे मिळून एकूण ६१ चंद्र आहेत.

लघुग्रह

लघुग्रह म्हणजे ठराविक आकार नसलेले लहान-मोठे दगड जे मंगळ व गुरु या ग्रहांच्यामध्ये सूर्याभोवती गोलाकार अशी प्रदक्षिणा पूर्ण करतात. या लघुग्रहांच्या पट्ट्यात असंख्य असे लघुग्रह आहेत. यांचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत: २.७ खगोलिय एकक आहे.

Tuesday, March 18, 2008

मंगळ

मंगळ हा सूर्यमालेतील पृथ्वीनंतरचा चौथा ग्रह. हा आकाराने पृथ्वीच्या व्यासाच्या निम्याहून थोडा जास्तच म्हणजे ६,७९५ कि. मी. एवढे आहे, व सूर्यापासुन याचे अंतर साधारणत: २२२७,९३६,६४० कि. मी. एवढे आहे. मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या दृष्टीने पहिला बहिर्ग्रह असल्यामुळे आपल्या आकाशात हा संपूर्ण रात्रभर देखील दिसतो.
मंगळ ग्रहाला स्वत:भोवती फिरण्यास २४ तास ३६ मिनिटे लागतात, तसेच सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास मंगळास ६८७ दिवस लागतात मंगळदेखील पृथ्वीप्रमाणे त्याच्या आसाभोवती २५.१९ अंशांनी कललेला असल्यामुळे याच्यावरदेखील पृथ्वीप्रमाणे उन्हाळा व हिवाळा असे दोन ऋतु आहेत.
हा ग्रह लालसर तांबडा रंगाचा दिसतो. मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले आहेत. यापैकी कित्येक ज्वालामुखी अजूनही जीवंत आहेत. मंगळावर निरीक्षणाद्वारे कालव्याच्या खुणा आढळल्या आहेत, यावरून पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे असा अंदाज आहे. तसेच या ग्रहावर एक प्रचंड मोठी एक दरी आहे ती आपल्याला पृथ्वीवरुन शक्तीशाली दुर्बिणीतून सुध्दा दिसते. या दरीला "मरिना दरी" असे म्हणतात.
मंगळावर सूर्याच्या बाजूवरील भागाचे तापमान साधारणत: २० अंश सेल्सीयस तर विरुध्द भागाचे तापमान १८० अंश सेल्सीयस असते.
मंगळ ग्रहाला दोन चंद्र आहेत. त्यातील जवळ असलेल्या चंद्राचे नाव फोबोस व दुरच्या चंद्राचे नाव डिमॉस आहे. यापैकी फोबोस मंगळापासून ५,८८० मैल आणि डिमॉस १४,६०० मैल अंतरावरुन मंगळाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात.

Monday, March 10, 2008

पृथ्वी

आपली पृथ्वी शुक्र ग्रहानंतर सूर्यमालेतील तिसरा ग्रह. आपली पृथ्वी एक संपूर्ण विश्वामधील जीवसृष्टी असलेली एकमेव ग्रह आहे. पृथ्वीला निळा ग्रह सुध्दा म्हणतात.
पृथ्वीचा व्यास १२,७५६ कि. मी. एवढा आहे, व सूर्यापासून पॄथ्वीचे अंतर साधारणपणे १४९,५९७,८९० कि. मी. एवढे आहे.
पृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या आसाभोवती २३.५ अंशांनी कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वत:भोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतूचक्र सुरु असते.
आपल्या पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे लागतात. पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता तर पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली नसती, तसेच पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण व सूर्यापासूनचे ठराविक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यामुळेच आपल्या पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण झाली असावी.
पृथ्वीला एक उपग्रह आहे तो म्हणजे आपला चंद्र.

Wednesday, March 5, 2008

शुक्र

शुक्र आपल्या सूर्यमालेतील बुध ग्रहनंतरचा दुसरा ग्रह. हा आकाराणे आपल्या पृथ्वीएवढाच आहे. याचा व्यास १२,१०४ कि. मी. एवढा आहे. शुक्र देखील आंतरग्रह आहे. यामुळेच शुक्रदेखील आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो.
या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्याप्रमात परावर्तित होतो. म्हणुन शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो.
शुक्राला स्वत:भोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पुर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. तसे बघितले तर शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे.
शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०८,२०८,९३० कि. मी. एवढे आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह एकसारख्याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पुर्वेकडे या दिशेने फिरतात. फक्त शुक्र हा एकच ग्रह पुर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो.
शुक्र हा देखील आंतरग्रह असल्यामुळे याचेसुध्दा सूर्यावरील अधिक्रमण आपणास पहावयास मिळते.
शुक्राला देखील एकही चंद्र नाही.