Tuesday, August 21, 2007

आपल्या सुर्यमालेचा जन्म

पाच अब्ज वर्षापूर्वी आपल्या आकाशगंगेच्या असंख्य तारकांमध्ये धुळीकण आणि वायुचा एक विशाल कृष्णवर्णी मेघ अवकाशात तरंगत होता. हा मेघ सर्व दिशांना निराकार आणि निर्विकार फिरत होता. एक दिवस अचानक त्या मेघाच्या स्वरुपात कायापालट होण्यास सुरुवात झाली.
अचानक या विशाल मेघाच्या आकुंचनाला सुरुवात झाली. मेघातील अती सुक्ष्म कण परस्परांच्या जवळ येऊ लागले. या कणांची गती क्षणाक्षणाला वाढू लागली आणि हा विशाल मेघ आपल्याच गुरुत्वाकर्षाणामुळे कोलमडू लागला. प्रारंभी हि प्रक्रिया हळुवार होत होती, कालांतराने या प्रक्रियेने चांगलाच वेग धरला. हे चक्र असेच लक्षावधी वर्षे चालू होते. शेवटी मेघाच्या केंद्रभागी अतीघन असा गाभा निर्माण झाला. त्या गाभ्याचे गुरुत्वकर्षण अती उच्च झाले. आकुंचन होताना ते मेघ जवळील उष्णता बाहेर प्रक्षेपित करीत होते.

मेघाच्या मुख्य स्वरुपाला आता हळूहळू आकार येऊ लागला. या मेघाला प्रथम दिर्घ वर्तुळाकार व नंतर बैलगाडीच्या चाकाप्रमाणे आकार प्राप्त झाला. चाकाच्या केंद्रस्थानी गुरुत्वाकर्षण, घनता व तापमान यांचे प्रमाण सर्वात जास्त होते. मेघांच्या भ्रमण कक्षे बाहेर असलेली धूळ आणि वायु अंतर्भागात जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्या चाकाच्या निरनिरळ्या भागात त्यांचे छोटे मोठे पुंजके बनू लागले. हे पुंजके स्वत:भोवती भ्रमण करता करता मुळ मेघाच्या केंद्रभागीसुद्धा भ्रमण करु लागले. हाच आपल्या ग्रहमालेचा सुरवातीचा प्रवास होता.

मेघाच्या अंतरभागात प्रचंड उष्णता निर्माण झाली व धूळीचे वाफेत रुपांतर झाले. मेघांचे तापमान वाढल्यामुळे केंद्रतील वायूचा बाह्यवर्ती दाब वाढला आणि शेवटी हा दाब एवढा वाढला की गुरुत्वाकर्षणामुळे चालू असलेली मेघांची आकुंचन क्रिया खुप मंदावली. आकुंचनाची क्रिया चालू झाल्यापासून काही सहस्त्र वर्षांनी या मेघाचे आकुंचन थांबले आणि या मेघांच्या गर्भातच आपल्या सुर्याचा जन्म झाला.

सुरुवातीला आपल्या सुर्याचे स्वरुप फार विचित्र होते. प्लुटोच्या कक्षेपर्यंत धूळ व वायु यांच्या शिवाय दुसरे काही दिसत नव्हते. रेशमी किड्याच्या कोशाप्रमाणे मेघाच्या गर्भात आपला सुर्य अतिरिक्त उष्णता विसर्जित करीत होता.

उष्णता उत्सर्जनामुळे सुर्याच्या तापमानात बदल झाला नाही, पण दाब मात्र कमी झाला. नंतरच्या काळात सुर्याचे आकुंचन होत गेले आणि काही लक्ष वर्षांनी सुर्याच्या आंतर्भागातील तापमान दीड कोटी अंश सेल्शिअसपर्यंत होत गेले. ही प्रक्रिया सुरू असताना अचानक अंतर्गत उष्णतेने विशिष्ट कमाल मर्यादा ओलांडली व अंतर्भागात आण्विक उर्जा प्रकट झाली. असे होताना हायड्रोजनच्या अणु मिलनाने हिलिअमची निर्मिती होण्यास सुरूवात झाली. हाच तो महत्वाचा क्षण होता आपल्या सुर्याच्या जन्माचा!

उष्णता वाढीचे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे आकुंचनाचे चक्र समाप्त झाले. आजपर्यंत ही प्रक्रिया सातत्याने चालू आहे.

कोषातील बहुतांश वस्तु सुर्यानेच आत्मसात केली. शिल्लक राहिलेले कणांचे अगदी लहान गोलात रुपांतर झाले. हे गोल आपआपसात टकरी घेत व तुकडे होऊन पुन्हा एकत्र येत आणि पुन्हा त्यांचे मोठ्या गोलात रुपांतर होई, ही प्रक्रिया होत असताना कही लक्ष वर्षांनी या गोळ्यांनी लहान मोठा आकार घेतला. हे गोल म्हणजेच आपले ग्रह. सुर्याच्या उष्णतेमुळे या ग्रहांवर बराच प्रभाव पडला. बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ यांचे वस्तुमान खडकंनी बनले गेले, व गुरुपासूनचे पुढील ग्रह वायुरूपी बनले. हलकी मुलद्रव्ये सुर्यापासून दूर फेकली गेली.

गुरु ग्रहाने सर्वात जास्त मुलद्रव्ये आपल्याकडे खेचुन घेतली, त्यामुळे गुरु ग्रह बराच मोठा व गुबगुबीत झाला. गुरु ग्रहाने स्वत:च्या व मंगळ ग्रहाच्या दरम्यान दुसरा ग्रह निर्माण होण्यास प्रतिबंद केला व त्या जागी लहान मोठे तुकडे तसेच अवकाशात भटकत राहिले. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांचे ग्रहात रूपांतर होऊ शकले नाही. त्या तुकड्यांस आपण लघुग्रहांचा पट्टा असे संबोधीतो.

आपल्या सुर्यामालेत काही छोट्या आकाराचे गोलही तयार झाले. ग्रहांच्या खेचाखेचीमध्ये अचानक गोल पृथ्वीच्या जाळ्यात सापडला; ज्याला आपण चंद्र असे म्हणतो. असेच इतर ग्रहांच्या बाबतीतही हेच झाले व त्यांना सुध्दा आपल्यासारखा चंद्र (उपग्रह) मिळाले. हे उपग्रह त्यांच्या ग्रहांच्या कक्षेत फिरु लागले. सर्वात जास्त उपग्रह गुरु ग्रहाला आहेत.

तसेच काहीप्रमाणे शनी ग्रहाच्या बाबतीतही झाले, पण शनीभोवतीचे काही कण एकत्र न येता तसेच शनी ग्रहाभोवती त्याच्या कक्षेत फिरत राहिले, याच कणांचे पुढे अद्वितीय अश्या कड्यांमध्ये रुपांतर झाले. अश्या प्रकारची कडी इतर ग्रहांना सुध्दा आहेत, पण ते पाहण्यास मोठी दुर्बिणीची आवश्यकता पडते. शनी ग्रहाची कडी पाहण्यासाठी साधारण दुर्बिणसुध्दा चालते.

सुर्याभोवती पसरलेल्या मेघात अनेक मुलद्रव्य होती. बुध या ग्रहावर लोहाचे प्रमाण जास्त आढळते. शुक्र, पृथ्वी व मंगळ यावर खडक, माती आणि सिलिकेट आदी मुलद्रव्य आढळतात. लघुग्रहांचा पट्टा या मुलद्रव्यांची अंतिम मर्यादा आहे. त्या पलीकडे तपमान खुप कमी होत गेले. पुढील सर्व ग्रहांवर बर्फाचे थर साचले. त्यात नायट्रोजन द्रवरूपात व मिथेन घनरुपात आढळते. नेपच्युन व युरेनसची वाढ होत असताना त्यांनी लहान मोठे आकाराचे बर्फाचे तुकडे दुर इतरस्त्र भिरकावून दिले त्यामुळे धुमकेतूच्या मेघांची निर्मीती झाली; त्यास आपण "ऊर्ट मेघ" असे म्हणतो. ह्या धुमकेतूंना सुर्यमालेत भिरकवण्याचे काम सुध्दा या दोन ग्रहांनी केले. गुरु ग्रहाने बहुतेक हे धुमकेतू स्वत:कडे खेचून घेतले व राहिलेले धुमकेतू इतर ग्रहांवर आदळले. ४.५ अब्ज वर्षांपर्यंत हा प्रकार असाच चालु होता. अशाच धुमकेतूमुळे बर्फाच्या अवस्थेत असलेले पाणी पृथ्वीवर आले, व जीवसृष्टीला पोषक असे वातावरण निर्माण झाले. पुर्वी सागरात असलेले पाणी आजच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात होते.

अशी ही आपल्या सुर्यमालेच्या जन्माची थोडक्यात कहाणी. हे असेच गेले ५ अब्ज वर्ष सतत चालू आहे व पुढेही असेच चालू रहिल.

1 comment:

deepanjali said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)